अहिल्यानगर, दि. २७ मे: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २८ मे ते १० जून २०२५ या कालावधीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी हा आदेश मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जारी केला आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास, तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका तसेच अंत्ययात्रा यांसारख्या सामाजिक व पारंपरिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही. त्याचप्रमाणे, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी व रितसर परवानगी घेणारे आयोजक यांनाही यामधून वगळण्यात आले आहे.
नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनास सहकार्य करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था टिकवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
