अहिल्यानगर: जिल्ह्यात २६ ते २८ मे २०२५ दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या तीन दिवसांच्या काळात विजा चमकण्याची, गडगडाट होण्याची तसेच झाडे उन्मळण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेला विसर्ग
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे दौंड पुल येथे १९,०५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा
वादळ आणि विजांच्या दरम्यान नागरिकांनी झाडांखाली उभे राहू नये तसेच विजेच्या खांबांपासून आणि वायरपासून दूर राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
© 2025 ABN News मराठी | ही बातमी ABN News च्या वृत्तसंकेतस्थळासाठी सादर करण्यात आली आहे. कॉपी/पुनर्प्रकाशनास मनाई आहे.
