खडकवाडी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अमरण उपोषण
पाटोदा (जि. बीड), २९ मे २०२५
खडकवाडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, निधी अपहार आणि लाभार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लोंढे यांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर आजपासून अमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत लोंढे यांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या असून, योग्य ती कारवाई होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
लोंढे यांच्याकडून पुढील मागण्या:
- सरपंच अपात्र ठरवावा – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६(१४)(अ) अंतर्गत कारवाई करावी.
- ₹४.३६ लाख निधीचा अपहार – दलित वस्तीतील कामे न करता निधी लंपास केल्याचा आरोप.
- वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणात अनियमितता – पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान द्यावे.
- नरेगा योजनेतील गैरव्यवहार – कोणताही ठराव किंवा प्रक्रिया न करता बील सादर करून कामे केल्याची तक्रार; चौकशीची मागणी.
- प्रधानमंत्री आवास योजना – मंजूर प्रस्ताव थांबवून लाभार्थ्यांना योजनेंपासून वंचित ठेवण्यात आले.
उपोषण स्थळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून, लोकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
"कारवाई न झाल्यास हे उपोषण मागे घेतले जाणार नाही," असा इशारा लोंढे यांनी दिला आहे.
या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
