पुणे – वैष्णवी हगवणे या तरुणीच्या मृत्यूमागील वास्तव उघड होत असताना, आता तिच्या दीराचा एक व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणात नवीन वळण आले आहे. सुशील हगवणे या आरोपीचा “माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय” हा वादग्रस्त संवाद असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
अधिकृत शवविच्छेदन अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर एकूण २९ गंभीर जखमा आढळल्या असून, त्यातील १५ जखमा केवळ मृत्यूपूर्वीच्या २४ तासांत झालेल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून तिच्यावर सलग मारहाण होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी तिचा पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, शहरात सामाजिक रोष उफाळून आला असून, उबाठा गटाच्या महिलांनी आरोपींच्या घरासमोर शेण फेकून आपला निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने कडक भूमिका घेत हुंड्यासाठी छळ करणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अशा कुटुंबांशी कोणतेही वैवाहिक किंवा सामाजिक संबंध ठेवले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकरण अधिक गंभीर ठरत असताना, तपासात आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटकातील एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले असून, त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, आणखी काही व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.