शिक्षणाचा उपयोग करून सुरू केला स्वतःचा ब्रँड; तरुणाची वर्षाला ४० लाखांची कमाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी): शिर्डीतील विजय गोंदकर या तरुणाने शिक्षणाचा उपयोग करत व्यवसायात यशस्वी वाटचाल केली आहे. पुण्यातून फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘सूर्या बेकरी’ या नावाने स्वतःचा ब्रँड निर्माण केला.
विजय गोंदकर यांनी शिक्षण घेत असतानाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला होता. २००६ पासून त्यांनी विविध फूड इंडस्ट्रीजना भेटी देत ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास केला. २०१० मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
२०१३ साली ‘सूर्या बेकरी’ची स्थापना झाली. सुरुवातीला अडचणी असूनही त्यांनी चिकाटी, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर व्यवसायात सातत्य राखले. आज त्यांच्या बेकरीत बिस्कीट, टोस्ट, खारी, पॅटिस, केक, सँडविच, बर्गर यांसारखी उत्पादने तयार केली जातात.
त्यांच्या व्यवसायातून सध्या २० जणांना रोजगार मिळत असून, ते दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाखांची उलाढाल करत आहेत.
"स्वतःच्या गावात व्यवसाय करून यशस्वी होण्याचा मार्ग प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे." — विजय गोंदकर
गावातच व्यवसाय उभारून यश मिळवणे आणि सोबतच इतरांना रोजगार देणे ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. विजय गोंदकर यांची ही कहाणी तरुणांसाठी मार्गदर्शक ठरते.
ABN न्यूज मराठी प्रतिनिधी | अहिल्यानगर
