जालना: जालन्याच्या भोकरदन परिसरात शेतमाल खरेदी करूनही पैसे न दिल्यामुळे व्यापारी पवन बिलगे फरार झाला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक महिला शेतकरी संतप्त होऊन भोकरदन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत.
आंदोलनादरम्यान पोलीस आणि महिला शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला पोलीस संरक्षण असल्याचा आरोप करत प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचा मोठा फटका
जवखेडा ठोंबरे गावातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका अशा पिकांचा शेतमाल पवन बिलगे यांच्याकडे विकला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्याने दिले नाहीत. अनेक वेळा पैसे देण्याचा आश्वासन देऊनही तो टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह
भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार असूनही व्यापाऱ्याविरुद्ध अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांमध्ये संताप वाढला आहे.
महिला शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली असून, आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक महिलांमध्ये धक्काबुक्की झाली. संतप्त महिलांनी व्यापाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
